पर्यावरण व संत श्री तुकाराम महाराज
संत तुकारामा महाराजांची अभंग गाथा ही एक जीवनाची पथदर्शी गाथा . . .जगण्यासाठीचा एक आश्वासक सूर . . .आमच्या दैनंदिन जीवन व्यवहारातील . समस्या आणि त्यावरील उत्तर संत साहित्यात सापडतं आणि सापडतंच . . .संत ज्ञानेश्वर, संत नामदेव ,संत एकनाथ , संत गोरा कुंभार, संत सावता माळी , संत नरहरी सोनार ,संत चोखामेळा ,संत सेना न्हावी आदीसारख्या संतांच्या रचना मानवी जीवनातील विविध समस्यांचे निरसन करण्यास उपयुक्त ठरतात. संत तुकारामांचे अभंग हे तर विविध अंगाने सजलेले ,नटलेले व मानवी जीवनातील विविध जाणिवांचा आविष्कार करणारे आहेत.सामाजिक समता,अंधश्रद्धा निर्मूलन ,अर्थविचार ,कृषिविचार अशा विविध अंगाचा विचार त्यातून आपल्याला घेता येतो.पर्यावरणीय समतोलाच्या दृष्टीनेही संत तुकारामांचे अभंग महत्त्वपूर्ण ठरतात.वास्तविक जीवन जगत असताना आम्ही आमच्या सुखासाठी निसर्गाचं नैसर्गिक निसर्गत्व हिरावून घेतो आहोत किंबहुना निसर्गावर घाला घालून अप्रत्यक्ष आमच्यावरच तो घाला घालतो आहोत.प्राणिमात्राकडून उत्सर्जित होणारा कार्बन डायऑक्साइड हे वृक्ष शोषून घेतात आणि आम्हाला आवश्यक असलेला ऑक्सिजन वायू देतात.अलीकडच्या काळात आम्ही बेसुमार वृक्षतोड केली आहे.परिणामस्वरूप वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढलेले आहे. त्याचाच परिपाक म्हणून ओझोनचा थर कमी होऊन 'ग्लोबल वॉर्मिंग' सारख्या संकटाला आम्हाला सामोरे जावं लागतं.ही सर्व सृष्टीसाठी एक धोक्याची घंटा आहे.मानव जातीवर आलेलं हे संकट टाळायचं असेल तर संत तुकारामांनी सांगितलेला -
"वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे । पक्षीही सुस्वरे आळविती ॥ " (अभंग क्र. २०७१ )
हा मूलमंत्र स्वीकारून आम्हाला पुढचा प्रवास करावा लागेल.
माणसाला जगण्यासाठी फार काही भौतिक साधनांची गरज नसते; परंतु वर्तमान स्थितीमध्ये सर्वच देश आपला प्रवास अविकसितपणाकडून विकसितपणाकडे करण्यासाठी औद्योगिकीकरण वाढवत आहेत आणि माणूससुद्धा स्वकेंद्रितपणातून निसर्गाचा ऱ्हास घडवून आणत आहे. वाढते जलप्रदूषण, मिथेन, कार्बनडायऑक्साईड ही त्याचीच परिणती. त्यातून निर्माण होणारे हरितगृह वायू माणसाचं जगणं सुखावह करण्याच्या ऐवजी दुःखाच्या गर्तेत ढकलत आहेत.अशावेळी संत तुकारामांच्या -
"येणे सुखे रुचे एकांताचा वास । नाही गुणदोष अंगा येत ॥
आकाश मंडप पृथिवी आसन ।रमे तेथे मन क्रीडा करू ॥ "
या विचाराचा अंगीकार करण्याची गरज आहे.मानवी जीवनाची खरी मन प्रसन्नता निसर्गाच्या सहवासात असून तिथेच माणसाला एकांत व शांती लाभते. बाह्य गोष्टीपेक्षा फुलाफळाने बहरलेले निसर्गाचे चैतन्य संत तुकारामांना जास्त मोहित करते.संत तुकारामांचा हा अभंग आम्हाला पर्यावरणातील प्रसन्नतेची अनुभूती देऊन जातो.
" ध्यानी योगीराज बैसले कपाटी । लागे पाटोवाटी तयांचिया॥ " (अभंग क्र.२७३६)
अर्थातच योगी, साधू ,तपस्वी हे ईश्वर चिंतन करीत डोंगरकपारित ध्यानस्त बसलेले असतात त्यांचे रक्षण सदैव तो परमेश्वर करीत असतो. साधुसंत ,योगी तपस्वी हे कशाचीही अभिलाषा बाळगत नाहीत. त्यांना निसर्गाच्या सहवासातच आध्यात्मिक उन्नती साधता येते. माणसाने खरे तर किमान आत्मिक उन्नती तरी निसर्ग सानिध्यात साधावी .निसर्ग,वेली,फुले फळे , डोंगरकपारी हे आमच्या जीवनाचे अविभाज्य घटक बनले पाहिजेत.निसर्ग संतुलित ठेवून विकास केला तर निश्चितच आम्हाला सुखा समाधान आणि जीवन जगता येईल. फुलाफळाने बहरलेला
निसर्ग सुखाचा हा अनुभव घेण्याच्या ऐवजी आम्ही भौतिक सुख सुविधासाठी प्रचंड वृक्षतोड करतो आहोत.औद्योगिक प्रगती झाली पाहिजे; परंतु त्यासाठी मानवी आयुष्य धोक्यात घालून नाही.आम्हाला निसर्गाचा संतुलन राखावाच लागेल.पर्यावरणातील रमणीय निर्भेळ आनंदाची प्राप्ती करून घ्यायची असेल आणि आपलं आयुष्य निरोगी ठेवायचं असेल तर वृक्षलागवड करावीच लागेल.
" सिंचन करिता मूळ । वृक्ष ओलावे सकळ ॥ " (अभंग क्र. २४७९ )
हा संत तुकारामांच्या अभंगाचा विचार समाजमनात रुजावा. ती काळाची गरज आहे.नुसती वृक्षलागवड करून भागणार नाही तर त्या वृक्षाला पाणी वगैरे घालून त्याचं संवर्धन करणे तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे. त्यासाठी सिंचन गरजेचे आहे.अगदी पाण्याचा होणारा अपव्यय टाळण्यासाठीसुद्धा हा विचार उपयुक्त ठरतो. .आज आम्ही 'पाणी आडवा पाणी जिरवा ' ही मोहीम राबविण्याऐवजी 'याची आडवा , त्याची जिरवा 'ही मोहीम राबवण्यातच मशगुल झालेले आहोत.उलट 'याची आडवा, त्याची जिरवा ' ऐवजी ' पाणी आडवा , पाणी जिरवा ' हा मंत्र आम्ही जोपासला तर निसर्गसुखाला पराङ्मुख होणार नाहीत.निसर्ग सान्निध्यातील सुख म्हणजे -
" तेथे माझ्या मना पक्षीराज । साधावया काज तृप्तीचे या ॥ "
अगदी याप्रमाणे आहे. संत तुकारामांच्या एकंदरीत पर्यावरणीय भूमिकेविषयी डॉ.देविदास पोटे यांनी - "शेती, पाणी वृक्षवेली याबाबत त्यांनी मांडलेले विचार निसर्ग तत्त्वाच्या मूळ गाभ्याला स्पर्श करणारे आहेत. त्यांच्या शद्बांना अनुभवाचे कोंदण आहे. सुमारे ४०० वर्षांपूर्वी पर्यावरणाची आजच्या वर्तमानाइतकी हानी झाली नव्हती. तरीही त्यांचे निसर्गाच्या पर्यावरणविषयीचे विचार काळाच्या कितीतरी पुढे होते याची आपल्याला जाणीव
होते. " असे गौरवोद्गार काढलेले आहेत. त्यांनी नोंदविलेले हे निरीक्षण अगदी यथार्थ वाटते.
संत तुकारामाची अभंग गाथा म्हणजे केवळ भक्ती गाथा नसून भक्ती बरोबरच मानवाला अनेक संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी उपयुक्त ठरणारी गाथा आहे.त्यांच्या अभंगातील पर्यावरणीय भूमिका आम्ही जोपासली तर निश्चितच निसर्गसुखाचा आनंद 'आनंदाचे डोही आनंद तरंग' याप्रमाणेच राहील.गरज आहे त्याला फक्त मानव जातीने मूर्तरूप देण्याची . . . एक माणूस म्हणून त्यांच्या विचारातील एक तरी बीज पेरत जाऊया . . .आणि निसर्गाला संतुलित राखण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडूया . . .
प्रा.डॉ.राजकुमार यल्लावाड
कै.लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालय,परळी वै.

Comments
Post a Comment