संत तुकाराम महाराज यांचा अर्थविवेक


 ( 'संत तुकाराम बीज ' निमित्त )

     महाराष्ट्र भूमीतील संतांनी आध्यात्माचा मळा फुलविता फुलविता समाजरुपी बागेत वाढलेलं विकृतीचे तण उपटून टाकून ही बाग सुंदर व आकर्षक करण्याचा प्रयत्न केला किंबहुना त्यांनी केलेल्या नीतिसंस्कारामुळे समाजमन निकोप आणि निरोगी राहण्यास मदत झालेली आहे.वास्तविक संतांनी आपले उभे आयुष्य 'स्व' विकासापेक्षा समाजाच्या विकासासाठी वाहिले आणि अवनत होत चाललेल्या समाजाला उन्नतीकडे जाण्याचा मार्ग दाखविला.परिणामस्वरूप अंधश्रद्धेपेक्षा विज्ञाननिष्ठा, अविवेकापेक्षा विवेकनिष्ठा , व्यभिचारापेक्षा अव्यभिचारीपणा अशा मूल्यनिष्ठतेची पूजा समाजमनात मोठ्या प्रमाणात वाढीस लागली.

    २१व्या शतकात विज्ञान युगातील मानव मात्र यशाची उत्तुंग शिखरे गाठतो आहे ;परंतु  देशात बऱ्याचदा नीतिमत्तेच्या सुगंधापेक्षा अनीतिमत्तेची दुर्गंधी दिसते आणि मन खिन्न व्हायला लागतं. पैसा मिळवण्यासाठी वाटेल ते करण्याची माणसाची प्रवृत्ती पाहून सर्व बाजूंनी अंधारल्यासारखं वाटायला लागतं.इथे युरिया घोटाळा,तेलगी प्रकरण,टु-जी स्पेक्ट्रम,राष्ट्रकुल, आदर्श घोटाळा,चारा घोटाळा, आरोग्य घोटाळा,सिंचन घोटाळा असे एक ना अनेक घोटाळे झालेले दिसतात.याशिवाय कोणत्याही कार्यालयात चिरीमिरी दिल्याशिवाय नस्ती(फाईल) पुढे सरकतच नसते.नीट,नेट किंवा लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षा यामध्ये मोठे गैरप्रकार होताना दिसतात हा एक भ्रष्टाचाराचाच भाग आहे.भ्रष्टाचाराच्या मार्गाने लोक पैसे कमवतात परंतु त्या माध्यमातून सर्वसामान्यांचे जीवन अवघड होत जातं हे मात्र त्यांच्या लक्षात येत नाही.फक्त आपली प्रचंड माया वाढवणे हाच त्यांचा स्वभाव धर्म बनतो.भ्रष्टाचाराच्या या किडीपासून मुक्तता मिळविण्यासाठी संत तुकारामाचे अभंग निश्चितच उपयुक्त ठरतात.

"परद्रव्य परनारी । अभिळासुनी नाक धरी ॥

जळो तयाचा आचार । व्यर्थ भार  वाहे खर ॥ " (अभंग क्र.३५१७)

    अर्थातच परद्रव्य ,परनारी याविषयी अभिलाषा बाळगणाऱ्या व्यक्तीबद्दल संत तुकारामांनी केलेले भाष्य माणसाला विचार करायला लावणारे आहे.माणसाचा मनोविकास करण्याचे सामर्थ्य त्यांच्या अभंगात आहे .

    आयुष्यात कितीही पैसा कमावला तर तो कमीच वाटतो लाखो ,करोडो रुपये वाम मार्गाने मिळवण्याच्या दृष्टीने माणसाची वाटचाल चालू आहे. अशावेळी *" धन मिळवूनी कोटी। सवे न ये रे लंगोटी। "* (अभंग क्र.३४०८)

 यासारख्या अभंगाचे क्षणभर थांबून स्मरण करणे अगत्याचे ठरते.

  "द्रव्याचिया मार्गे कळी काळाचा लाग। म्हणोनिया संग खोटा त्याचा॥"

  ही जाणीव भ्रष्टाचारी मनाला झाली तर त्याच्या हातून घडणारे दुष्कृत्य निश्चितच कमी होईल.माणसाने हव्याशी प्रवृत्ती ठेवून भ्रष्टाचार करण्यापेक्षा समाधानी प्रवत्तीने राहणे तितकेच महत्त्वाचे आहे.समाधानी मन कशाचीही अभिलाषा बाळगत नाही.

  " चित्त समाधान । तरी विष वाटे सोने॥ " (अभंग क्र. ३२११)

    हा संत तुकारामाचा अभंग आविष्कार चित्त समाधानाच्या दृष्टीने उपयुक्त ठरतो.

       आयुष्य सुंदरतेने जगण्यासाठी अलीकडच्या चलनी व्यवहारात पैशाची आवश्यकता आहे.माणसाने आयुष्यात पैसा कमावला पाहिजे पण तो कमावताना 'उत्तम व्यवहारातूनच ' कमावला पाहिजे.यादृष्टीने -

   "जोडोनिया धन उत्तम वेव्हारे । उदास विचारे वेच करी ॥

उत्तमची गती तो एक पावेल । उत्तम भोगील जीवखाणी ॥ "

   कष्टातून सन्मार्गाने मिळवलेली संपत्ती जीवनाला गती देते ;आणि अशा संपत्तीतून मिळणारे समाधान हे सुखावह असते.हा संदेश या अभंगातून मिळतो.सृष्टीतील सर्व माणसाच्या मनाची जडणघडण संत तुकाराम यांच्या या अभंगाप्रमाणे झाली तर भ्रष्टाचार नक्कीच कमी होईल.परिणामस्वरूप सर्वसामान्याला जीवन सुखकारक वाटेल .सृष्टीत सौख्य व मांगल्याची वारे वाहू लागतील; आणि प्रत्येक व्यक्ती आनंदाने जीवन जगू लागेल. त्यांच्या अभंगातील जाणिवेचा संदेशाचा सौहार्दाने स्वीकार करून आचरण केले तर प्रत्येकाच्या जीवनात 'सोनियाचा दिनू 'उगवल्याशिवाय राहणार नाही.तेव्हाच कुठे आपल्याला तुकाराम बीज साजरी करण्याचा  आनंद हा नुसता आनंद न ठरता प्रमोच्च आनंद देऊन जाईल.

Comments

Popular posts from this blog

संस्कृती रक्षणासाठी मातृभाषा रक्षण व संवर्धन आवश्यक - प्रा.डॉ. राजकुमार यल्लावाड*

पर्यावरण व संत श्री तुकाराम महाराज